पर्यावरण रक्षणाऐवजी महापालिकेकडून 2 कोटी 40 लाखांची जळाऊ लाकूड खरेदी
गॅस शवदाहिनीवरील दीड कोटीचा खर्च हवेत
प्रदूषण टाळण्यासाठी विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटीची चिमणी
प्रतिनिधी
विरार : सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमींत शव दहनासाठी जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्याकरता वसई-विरार महापालिकेने 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विरार-विराट नगर येथील स्मशानभूमीत दीड कोटी रुपये खर्च करून वायुउत्सर्जन चिमणी बसविण्याचाही निर्णय घेतलेला आहे. मागील पाच वर्षांत पालिकेने जळाऊ लाकडांवर अंदाजे 10 कोटी रुपये खर्च करून ‘केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा`ला चितेवर चढवले आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत एकूण 88 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींत प्रेत दहनाकरता जळाऊ लाकडे महापालिकेमार्फत मोफत पुरवण्यात येतात. मार्च 2023 पर्यंत प्रेतदहनाकरता 3109 टन 695 किलोग्रॅम जळाऊ लाकडांचा वापर झालेला आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 अखेरपर्यंत एकूण 8801 शव दहन करण्यात आली असल्याचे पालिकेने म्हटले आहे. तर मार्च 2024 पर्यंत 4083 टन 575 किलो जळाऊ लाकडांचा पुरवठा झालेला आहे. या माध्यमातून एप्रिल 2023 ते मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण 8742 शव दहन करण्यात आलेली आहेत. सन 2019 ते 2024 पर्यंत वसई-विरार महापालिकेने 8 कोटी 67 लाख 87 हजार 683 इतका खर्च केवळ जळाऊ लाकडांवर केलेला आहे.
दरम्यान; कोविड संक्रमण काळात वाढलेली मृत्यूंची संख्या; शिवाय मृतदेह जाळताना होणारे प्रदूषण रोखणे, वृक्षांचे संवर्धन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमां`तर्गत पालिकेने शहरातील स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या 32 कोटीच्या निधीतून आचाळेसह पाचूबंदर, नवघर, समेळपाडा आणि विरार स्मशानभूमींत गॅसशवदाहिनी बसवण्यात आलेली होती. त्यासाठी प्रति गॅस शवदाहिनी 32,97,510 इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. चार स्मशानभूमींतील गॅस शवदाहिनीकरता पालिकेने तब्बल 1 कोटी 31 लाख 90 हजार 040 रुपये खर्च केलेले आहेत.
प्रत्यक्षात; या गॅस शवदाहिनींचा वापर होण्याऐवजी जळाऊ लाकडांचा वापर वाढत असल्याचे निरीक्षण आहे. शिवाय केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी संकल्प असलेल्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा`ची पूर्ती होण्याऐवजी भ्रष्टाचार वाढीस उत्तेजन मिळत असल्याचे वसई-विरारकरांचे म्हणणे आहे. त्यात स्मशानभूमींत होणारे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने विरार-विराट नगर येथील स्मशानभूमीत तब्बल दीड कोटी रुपये खर्चून वायुउत्सर्जन चिमणी बसविण्याचाही निर्णय घेतलेला असल्याने पालिकेच्या या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
*
मागील पाच वर्षांत जळाऊ लाकडांवर झालेला खर्च!
सन खर्च 2019-20 1,95,44,127 2020-21 1,76,07,609 2021-22 1,68,66,770 2022-23 1,36,12,755 2023-24 1,91,56,422