‘तुमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करू नका,’ मी, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. हे वचन कुण्या मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक किंवा बक्कळ धनसंपत्ती असलेल्या कुबेराचे नाही तर तुमच्या माझ्यातील एका सर्वसामान्य माणसाचे आहेत. मेरे पास भगवान का दिया सब कुछ है!.. गाडी है, बंगला है, बीवी है बच्चे है!.. और क्या चाहिए? झापडबंद, एकलकोंड जीवन. आपलं साधलं मग जगाची धुणीभांडी करायची गरज काय? या विशिष्ट कोषात वावरणाºया माणसांतील मी, नाही! समाजातील गरीबी, अज्ञान, दु:ख, दारिद्र्य, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषमता पाहून तीळतीळ तुटतो. आपल्या कमाईतला चार आणे हिस्सा तरी या गरीब, वंचितांसाठी खर्च करून काही करता आलं तर या जीवनाचं सार्थक होईल, या सामाजिक जाणीवेतून सोलापूर जिल्हा, करमाळा तालुका, हिसरे गावचा नागेश मल्हारी ओहळ हा तरुण गोरगरीब, वंचित मुलांसाठी परिवर्तनाचा वाटसरू ठरू पाहतो आहे.
आजघडीला स्मार्ट सिटी व स्मार्ट गावाचा लाख गाजावाजा सुरू असला तरी शहरे व शहरात राहणारेच स्मार्ट, हेच वास्तव आहे. आजघडीला आपली जन्मभूमी असलेलं गाव, तिथली माणसं आपल्याला दिसेनाशी व आठवेनाशी झाली आहेत. शहरातला माणूस चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाला असताना गावचा माणूस मात्र आजही डोंगर- माळरान धुंडाळत आहे. शहरातील विद्यार्थ्यांचा हाती इंटरनेटसंपन्न मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आयपॅड आदी आधुनिक साधने आली. मात्र गावखेड्यातील गरीब विद्यार्थी इच्छा असूनही शिक्षणापासून कोसो दूर आहेत.
दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवणारी उस्मानाबाद जिल्’ातील एक विद्यार्थिनी रोजंदारीवर काम करणाºया वडिलांच्या खांद्यावर आणखी किती शिक्षणाचा भार टाकायचा, या विवंचनेतून आत्महत्येचा मार्ग निवडते. गरीबी हेच तिच्या आत्महत्येचे कारण. अशा अनेक बातम्या दररोज समाजमनाला हादºयांवर हादरे देत आहेत.
गरीबी आणि हालाखीचं जीवन जगणाºया अशाच वंचित मुलांसाठी मला काय करता येईल? त्यांना आत्महत्येपासून कसं परावृत्त करता येईल? या विचाराने अस्वस्थ झालेला नागेश ओहळ हा तरुण आपल्या कमाईतला चार आणे हिस्सा गरीब वंचित मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी लावून नवीन शैक्षणिक चळवळीचा धागा बनू पाहतो आहे. त्याची सुरुवात आपलं मुळगाव सोलापूर जि. करमाळा तालुका हिसरे गावापासून करून वंचितांसाठी समृद्ध शिक्षणाचा पाया रचण्यास त्याने सुरुवात केली आहे.
‘व्हाईट चेरी फाउंडेशन’द्वारे ‘मिशन आणि व्हिजन’डोळ्यापुढे ठेवून हिसरे जिल्हा परिषद शाळेतील आठ, करमाळा तालुका हिवरे गावातील पाच आणि कोळगाव येथील पाच अशा १८ गरीब मुलांना दत्तक घेवून त्यांचे पालकत्वही त्याने स्वीकारले आहे. शहरातील मुलांप्रमाणे माझ्या गावखेड्यांतील मुलांनाही फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे. ही मुलेही संगणक साक्षर झाली पाहिजेत. माझ्या गावातील जिल्हा परिषदेची शाळाही डिजिटल झाली पाहिजे, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग त्याने मनाशी बांधला आहे.
‘पैशाने सर्वच मोठे होतात पण मनाचे मोठेपणं हेच खरे मोठेपण’, हा आई सुलोचना यांनी घालून दिलेला आदर्श वंचितांसाठी झपाटून काम करण्याची उभारी देत असल्याचे नागेश सांगतो.
१९९७ साली मिडियाशी ओळख झाल्यानंतर समाजातील चांगल्या, वाईट घडोमाडीचं प्रतिबिंब एक वृत्तछायाचित्रकार म्हणून कॅमेºयात कैद करू लागलो. यातूनच समाज एका वेगळ्या नजरेतून पाहण्याची दृष्टीही मिळाली. मुंबई शहरात मित्र व नातलगांसोबत हॉटेलिंग, खरेदीवर दिवसाला होणारा खर्च हा आपल्या गावखेड्यातील एका कुटुंबाचा महिन्याचाही खर्च नाही, हे जगण्याचं गणितही आपल्याला बरचं काही शिकवून गेल्याचं नागेश सांगतो. कामगार आणि कष्टकºयांची वस्ती असलेल्या वरळी विभागतच लहानाचा मोठा झाल्याने गरीबी व दु:ख जवळून पाहिले.‘आपल्या मुलाने असं काही करावं की ज्यानं त्याचं व गावाचंही नाव मोठं होईल’, हा वडिलांनी मनावर बिंबवलेला विचार वंचितांसाठी संघर्षाला बळ देत आहे. आपल्या गावी आठ-दहा लाखाचं मंदिर उभारून स्वत:चं व कुटुंबाचं नाव चमकावण्यापेक्षा ज्ञानमंदिरातून माणसांतील देव जागा करण्याचे मिशनच मला महत्त्चाचे वाटते, ही नागेशची तळमळ त्याच्या डिजिटल शिक्षण चळवळीला उभारी देत आहे.
‘मायमराठी’चं कवतिक आपल्या प्रत्येकाच्या तोंडी असलं तरी मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा व गावखेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आजला एकामागोमाग एक बंद होत आहेत. आपल्या अनेक पिढ्या याच शाळांत शिक्षणाचे बाळकडू पिऊन मोठा झाला. पण, आता या शाळेचे नाव काढताच नाके मुरडली जात आहेत. नागेशसारखा तरुण हे चित्र बदलण्यासाठी आपल्या गावखेड्यातील जिल्हा परिषदेची शाळा आधुनिक व समृद्ध करण्यासाठी झटत आहे. सोलापूर जिल्हा परिषद, हिसरे गावात नोव्हेंबर २०१६ पर्यंत पहिली ते सातवीपर्यंत डिजिटल शाळा करणारच, हे लक्ष्य त्याने डोळ्यांपुढे ठेवले आहे. शहरातील मुलांप्रमाणे गावखेड्यातील मुलेही शिक्षणाच्या नव्या प्रवाहात कुठेच कमी पडू नयेत. त्यांच्यातही जग जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, हाच आपला एकमेव स्वार्थ यामागे असल्याचे तो सांगतो. ‘आज तु एकाला मदत केलीस तर उद्या तो दुसºयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील’, ही भावना प्रत्येकांच्या मनात वाढीस लागल्यास वंचितांसाठी शिक्षण चळवळीचा हा वटवृक्ष नक्कीचं बहरेल, हा विश्वासच नागेशच्या डिजिटल शिक्षण क्रांतीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहे.
फळाफुलांचा मळा पाहिजे,
आनंदाचा सोहळा पाहिजे,
गावात एकवेळ देऊळ नसेल तरी चालेल
पण एक आदर्श शाळा पाहिजे!
संपर्क नागेश ओहळ : ८४४६८१९१९९
लेखक : विनोद साळवी