-
आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल कधीही वाजेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसईत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन वसईतील स्थानिक बहुजन विकास आघाडी हा पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. याच कामांचा भाग म्हणून नुकतेच विरार-चिखलडोंगरी येथील महावितरणच्या विद्युत केंद्राचं भूमिपूजन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नालासोपाराचे युवा आमदार अर्थात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते झालं. अर्थात; आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विशेष वक्तव्यामुळे हे भूमिपूजन वैशिष्टपूर्ण आणि वसई-विरारकरांचं लक्ष वेधणार ठरलं आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या भूमिपूजनाच्या सरतेशेवटी जाणीवपूर्वक; किंबहुना सर्वांना माहीत असावं, या उद्देशातून या विद्युत केंद्राकरता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचं मौलिक योगदान लाभल्याची जाहीर वाच्यता केली. वसईच्या राजकीय वर्तुळात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेलं हे वक्तव्य आत्यंतिक महत्त्वाचं मानलं जात आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांचं हे वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला दिशा देणारं असेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने वसई, नालासोपारा आणि बोईसर हे तीन मतदारसंघ बहुजन विकास आघाडीविरोधात लढवले होते. पण निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीतील शीतयुद्ध बहुजन विकास आघाडीच्या पथ्यावर पडलं होतं. भाजपने शिवसेनेच्या जागा कमी करण्याच्या राजकीय हेतूतून या तीनही मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीला ताकद दिली होती. कारण या तीनही जागा भविष्यात भाजपच्या जागा वाढल्यास सत्तेसोबत येतील, अशी आशा भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना होती. बहुजन विकास आघाडीचा इतिहासही आपला प्रदेश सांभाळताना सत्तेसोबत जाण्याचा राहिला आहे. त्या वेळच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यास भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी शक्यता होती. त्यामुळे बहुजन विकास आघाडीनेही भाजपला आधीच जाऊन समर्थन दिलं होतं. त्या पश्चात महाविकास आघाडीचा सरकार स्थापन झाले व हितेंद्र ठाकूर यांनी व्हाया शरद पवार अशोक चव्हाण यांची भेट घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पुढे शिवसेनेचा पक्ष फोडून महायुतीचे सरकार स्थापन झाले व बहुजन विकास आघाडीने पुन्हा महायुतीस पाठिंबा देऊन आपली सत्तेसोबत राहण्याची परंपरा कायम राखली. या राजकीय साठमारीत शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालं आणि भाजप आणि बहुजन विकास आघाडी असे दोघंही तोंडावर पडले. शिवसेनेसोबत खेळलेल्या या राजकीय कुटील डावात भाजप व बहुजन विकास आघाडीतील प्रेम लपून राहिलं नाही. नंतरच्या काळात विविध निवडणुकांनिमित्ताने भाजपच्या अनेक नेत्यांनी विरार येथील विवा कॉलेजच्या उंबरठ््यावर पायधूळ झाडली. डोकं रगडलं. यातून भाजप व बहुजन विकास आघाडीतील सख्य अधिकाधिक अधोरेखित झालं. परंतु भाजप सोबतच्या या सलगीने बहुजन विकास आघाडीचा पारंपरिक मतदार काही प्रमाणात दुरावला.
तीन आमदार असूनही बहुजन विकास आघाडीला राजकीय ‘बार्गेनिंग पॉवर` कधीच दाखवता आली नाही. उलट त्यांचा वापरच जास्त झाला. याचे थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतही दिसून आले. या निवडणुकीत भाजप किंवा शिवसेना बहुजन विकास आघाडीसोबत उमेदवार देण्यावरून वाटाघाटी करेल, अशी शक्यता होती. परंतु शिवसेनेने त्यांना अजिबात धूप दाखवला नाही. कारण 2019 मधील निवडणुकीत बहुजन विकास आघाडी हा भाजपपेक्षा शिवसेनेचा थेट विरोधक होता. शिवाय देशातील व राज्यातील सत्तापालट लक्षात घेता बहुजन विकास आघाडी शिंदे व फडणवीस यांच्यासोबतच जाईल, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नव्हती. याची झलक मागील वर्षी विवा कॉलेजमधील ‘साहित्य संमेलना`च्या निमित्ताने सर्वांनी पाहिलीच होती. 2019 च्या निवडणुकीत बविआला ‘राजकीय पॉवर` दाखवलेल्या एकनाथ शिंदे यांनी या वेळी मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गळ्यात स्तुतिसुमनांचे हार घातले. त्याही आधी त्यांनी ‘आप्पा; शिकायत का मौका नही दुंगा` म्हणत आमदार हितेंद्र ठाकूर यांना सरेंडर झाले होते.
दरम्यानच्या काळात भाजपने बहुजन विकास आघाडीचा आपल्या सोयीसाठीच अधिक वापर केला, हेही वेळोवेळी दिसून आलं. बहुजन विकास आघाडीला भाजपकडून लोकसभा निवडणुकीतही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या निवडणुकीत भाजपने ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडावी, अशी अप्रत्यक्ष इच्छा बहुजन विकास आघाडीची होती. सरतेशेवटी वाट पाहून कुंथलेल्या बहुजन विकास आघाडीने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पण त्यांना भाजपच्या ताकदीपुढे सर्वशक्तीनिशी लढता आलं नाही. किंबहुना त्या पद्धतीने लढण्यासाठी त्यांनी उमेदवार दिलाच नव्हता. उलट भाजपने मतविभाजनासाठी (ख्रिस्ती व मुस्लिम ) बहुजन विकास आघाडीचा वापर करून घेतला. बहुजन विकास आघाडी या मतदारसंघांतील आपलं ख्रिस्ती व मुस्लिम मताधिक्क्य कायम ठेवू शकली, तर भाजपचा विजय सुकर होणार होता. पण या दोघांची कुटील नीती मुस्लिम व ख्रिस्ती मतदारांच्या नजरेतून सुटली नाही. अपेक्षेप्रमाणे यातील बहुतांश मतं शिवसेनेच्या पदरात पडली. बहुजन विकास आघाडी किमान दुसऱ्या स्थानाला येईल, अशी आशा त्यांच्या नेत्यांना होती. पण तसं मुळीच झालं नाही. त्यांना त्यांची मतंही सांभाळता आली नाही. अर्थात, अपेक्षेप्रमाणे बहुजन विकास आघाडीने भाजपच्या विजयास हातभार लावला तरी त्यांचं घटलेलं मताधिक्क्य त्यांची आमदारकीची खुर्ची हलवणारं होतं.
ही भरपाई करण्याच्या दृष्टीनेच आता बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे नेते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नुकतीच ख्रिती मतदारांना माऊंट मेरीची ट्रिप घडवून आणली आहे. मुस्लिम मतदारांना चुचकारण्यासाठी त्यांनी त्यांच्या जुलूसमध्येही सहभाग नोंदवलेला आहे. अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग जाणीवपूर्वक दिसतो आहे. एरव्ही कुठेही न दिसणारे युवा आमदार क्षितिज ठाकूरही दहीहंडीनंतर अनेक कार्यक्रमांत दिसून आलेले आहेत. अर्थात; आमदार द्वयींची सक्रियता निवडणुका उंबरठ्यावर आल्याची नांदी आहे.
पण विद्युत केंद्राच्या भूमिपूजनादरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा केलेला उल्लेख अधिक अधोरेखित करण्यासारखा आहे. कारण बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपसाठी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा बळी दिलेला आहे. त्याची पुण्याई म्हणून भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत वसई आणि नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीसाठी सोडेल, अशी शक्यता आहे. कदाचित बोईसरच्या जागेवर वाटाघाटी होतील. यात राजेश पाटील यांचीच पुन्हा एकदा आहुती दिली जाईल. हा निर्णय सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे. पण बहुजन विकास आघाडीच्या पिता-पुत्रांचा विजय सुकर होण्याच्या दृष्टीने रणनीती ठरले, यात नवल नाही. तोपर्यंत बहुजन विकास आघाडीलाही ‘फडणवीस`पूजेशिवाय पर्याय नाही. विद्युत केंद्राच्या भूमिपूजनादरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वाढवलेला नारळ त्याचाच भाग मानला जात आहे.
-
About Author
Maintain by Designwell Infotech