`माणूस जन्माला येतो पण माणुसकी निर्माण करावी लागते’, हेच खरं मानवी जीवन आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर चांगली माणसं भेटतात. ही चांगली माणसं आपल्याला बरचं काही शिकवून जातात. अशाच माणसांतील एक चांगला माणूस म्हणजे प्रमोद गणेशे. खरं तरं या व्यक्तीच्या नावातंच गणेश आहे. गणरायाच्या आश्वासक, करुणामयी मूर्तीसमोर आपण अनेकदा नतमतस्तक होतो. पण, ही गुणांची देवता आहे. तिची केवळ पूजा करण्याऐवजी चांगला माणूस होण्यासाठी दुसऱयाने आपल्यासमोर ठेवलेल्या `आदर्शांची पूजा व्हायलाच हवी ना? आयुष्यात आपल्या भाळी समाधानाची रेषा कायम असावी, हसतमुख रहावं ही जीवन जगण्याची कला शिकवणारे प्रमोद हे माझे दैनिक `प्रहार’मधील जुने सहकारी व मित्र.
साधारण 2008च्या सुमारास या हसतमुख व्यक्तिमत्त्वाशी माझा परिचय झाला. तेव्हापासून या व्यक्तीच्या नावाप्रमाणे त्याच्या गुणविशेषांच्या प्रेमात पडण्यास मी भाग पडलो. कोणत्याच कामाला नाही म्हणायचं नाही. त्रासायचं नाही, कंटाळायचं नाही. अविरत काम. कुणावरही कधी राग व्यक्त करायचा असेल तर तोही प्रेमाने. असं म्हणतात, की `प्रेमाने जग जिंकता येते,’ पण माणसांच्या दुनियेत माणसानं माणसांवर प्रेम करणं कधी जमेलंच असं नाही. प्रमोद गणेशे यांच्यासारखी माणसे मात्र त्याला अपवाद ठरावी. `संगणेशाय् नम्’:!… ही तपोसाधना ज्यांनी अथक मेहनतीच्या बळावर पूर्ण केली. असं संगणक क्रांतीतलं आघाडीचं नाव म्हणून प्रमोद गणेशे यांना आदराचं स्थान द्यायला हवं. 2005 साली रोजीरोटीच्या शोधात मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील एका छोटय़ाशा खेडेगावातून प्रमोद यांनी मुंबई गाठली. संगणकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज होणारे नवनवे बदल, सहजगत्या आत्मसात करणाऱया या तरुणाला मुंबईत पहिला ब्रेक मिळाला तो `डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्रात.
जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वावरणाऱया या तरुणाचा मित्रपरिवार आणि गोतावळा अल्पावधीतच वाढला. बापूजी आणि माताजी (आई आणि बाबा) यांच्यापासून साधी राहणी आणि उच्चविचारसरणी हा गुण हेरल्याचे तो सांगतो. संगणकीय क्षेत्रात कायम जागृत ठेवलेली चिकित्सक वृत्ती, नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी यामुळे हार्डवेअर, सॉफ्टवेअर अशा प्रत्येक क्षेत्रांत प्रमोद नावाच्या तरुणाने आपल्या कार्यकतृर्त्वाचा झेंडा रोवला. काम कोणतंही असो तुम्ही कामाबद्दल परफेक्शनिस्ट असायला हवं, हीच प्रमोद यांची जीवनातील विचारसरणी आहे. या विचारांना अनुसरूनच त्यांची वाटचाल सुरू असते.
मध्य प्रदेशातील लिटिल फ्लॉवर हायस्कूल (कॉन्व्हेंट) मध्ये प्रमोद यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. तेथे शिक्षण घेत असताना शिक्षकांनी व वडिलधाऱया माणसांनी सांगितलेले चांगले विचार तो आत्मसात करत गेला. शाळा, महाविद्यालय करत करिअरच्या एका वळणावर येऊन पोहोचलेल्या गणेश यांना त्यांनी केलेल्या गुणांच्या पुजेचाच पुढे लाभ झाला. 2000 साली हरियाणा पानिपत येथे देशातील सर्वात मोठा मिडिया ग्रुप असलेल्या `दैनिक भास्कर’मध्ये प्रमोदला नोकरी मिळाली. डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनअरिंग ही संगणकीय क्षेत्रातील पदवी ग्रहण केल्यानंतर की बोर्ड, माउस, पीसी आणि कॉम्प्युटर स्क्रीनच्या दुनियेत वावर वाढलेल्या प्रमोद यांनी `इच वन, टीच वन’ हा मंत्र जपला. आपल्यातील ज्ञान आणि कौशल्याचा इतरांनाही फायदा व्हावा म्हणून त्यांनी अनेकांत दडलेल्या संगणकतज्ञाला पुढे आणले. त्यामुळे अनेक सहकारी आणि मित्रमंडळींत प्रमोद यांना आपोआपचं आदराचं स्थान मिळालं. `स्वत:च्या कामाशी आणि विचारांशी प्रामाणिक असलेल्या या माणसाने चांगले यश मिळाले म्हणून कधी डोक्यात हवा जाऊ दिलेली नाही. लहान, थोर, वरिष्ठ, कनिष्ठ कुणाशीही बोलण्यातील अदब न बदलणारा हा माणूस विरळाच म्हणावा लागेल. अदबशीर, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा हा माणूस त्यामुळचे सर्वांना आपलासा वाटतो.
वयाच्या 20 व्या वर्षी नोकरीला सुरुवात करून जगाला आत्मविश्वासाने सामोरे जाणाऱया या मराठी तरुणाने भोपाळ ते पानिपत असा प्रवास करत राजधानी मुंबई गाठली. `फिर कभी मुड के नही देखा’असे आत्मविश्वासाने सांगणाऱया प्रमोद यांना वरळी सी-फेसवर कटिंग चहाचा घोट गळय़ाखाली उतरवत अथांग सागराच्या डोळय़ात डोळे घालायला आवडते. `गरीबीचा बाऊ नाही आणि श्रीमंतीचा माज नाही’ हे जगण्याचे तत्त्व सांगणारे लोक खूप आहेत. पण, प्रत्यक्षात वागणुकीत उतरवणारे हे गुणगणेश अर्थात प्रमोद गणेशे अभावानेच सापडतात. आमच्या मित्रपरिवारात ते असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
– विनोद साळवी