विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘सी`मधील वरिष्ठ लिपीक विजय विनोद गोतमारे यांच्या नियमबाह्य बढतीविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश कदम यांनी आज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले. विरार पश्चिम येथील वसई-विरार महापालिका मुख्यालयासमोर सकाळी 11 वाजता त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या सदस्यांसह सुरुवात केली. वरिष्ठ लिपिक विजय गोतमारे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही महापालिका प्रशासनाने त्यांना बढती दिलेली आहे. हा निर्णय नियमबाह्य असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रामुख्याने या आंदोलनादरम्यान त्यांची होती.
वसई-विरार महापालिकेत लिपीक-टंकलेखक या पदावर कार्यरत विजय विनोद गोतमारे या कर्मचाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी 24 तासांपेक्षा जास्त काळ अटकेत होता. नियमानुसार त्याला बडतर्फ करणे आवश्यक असताना वसई-विरार महापालिकेने मात्र अभय दिले आहे. किंबहुना इतक्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यानंतरही त्याला वरिष्ठ लिपीक पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत विजय विनोद गोतमारे याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी महेश कदम यांनी लावून धरली आहे. दरम्यान; आस्थापना विभागाचे उपायुक्त सदानंद पुरव यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले. येत्या 20 तारखेपर्यंत वरिष्ठ लिपीक विजय विनोद गोतमारे यांच्याविरोधात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती महेश कदम यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
2016 साली विजय गोतमारे याची वसई-विरार महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर लिपिक-टंकलेखक या पदावर नियुक्ती झाली होती. दरम्यानच्या काळात मौजे विरार सर्व्हे नं. 112/1,12/3,112/04,112/05,113/पैकी,114/05 व 115/03 या जागेवर बोगस कागदपत्रांद्वारे अनधिकृत बांधकाम करून त्यातील सदनिका ग्राहकांना विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक-बिल्डर म्हणून विरार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील 36 आरोपींत विजय गोतमारे याचाही समावेश होता. यात विजय गोतमारे हा क्रमांक चारचा आरोपी होता. तत्कालिन प्रभारी सहाय्यक आयुक्त मेरी तुस्कानो यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात भादंवि कलम 420,465,467,471,474,34 सह महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम -53,54 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी गोतमारे याला 5 ऑगस्ट 2016 रोजी अटकही झालेली होती.