गावापाठोपाठ माकडांच्या टोळ्या शहरात दाखल
महाड – प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात माकडांच्या टोळ्या आणि इतर वन्य प्राण्यांनी गाव आणि शहराची वाट धरल्याचे अनेक घटनांतून दिसून आले आहे. या माकडांनी आता शहरात बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. महाड शहराच्या वेशीवर असलेल्या या माकडांच्या टोळ्या आता शहरात दाखल झाल्या आहेत. भविष्यात या माकडांचा त्रास शहरी नागरिकांना देखील होण्याची शक्यता आहे.
महाड सह अन्य भागांमध्ये वन्य प्राण्यांचा राबता आता शहर आणि गावांच्या शेजारी झाला आहे. अनेक घटनांमधून वन्य प्राणी गावात किंवा शहरात दाखल झालेले असताना वनविभागाने पकडल्याचे दिसून आले आहे. त्यातच जंगलात राहणाऱ्या माकडांच्या टोळ्या देखील आता अनेक गावांमध्ये शिरल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महाड तालुक्यात अनेक गावांमधून या माकडांचा त्रास गेले अनेक वर्ष जाणवत आहे. घरांची कौले काढून आत मध्ये प्रवेश करून घरातील सामान, अन्नधान्याची नासाडी करण्याचे काम या टोळ्यांकडून केले जात आहे. याबाबत वनविभागाला अनेक वेळा निवेदन देऊन देखील याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्याचप्रमाणे घराच्या शेजारी किंवा परिसरात केल्या जाणाऱ्या भाजीपाला फळभाज्यांवर देखील या माकडांच्या टोळ्या ताव मारताना दिसतात. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. याबाबत ठोस उपाय योजना होत नसल्याने शेतकऱ्यांनी पालेभाजी करणे देखील सोडून दिले आहे.
याच माकडांच्या टोळ्या आता महाड शहराच्या काही भागांमध्ये येऊन विसावल्या आहेत. शहरातील शेडाव नाका या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्ष माकडांचा राबता आहे. येथील इमारतींमध्ये इकडून तिकडून सैरावैरा पळणाऱ्या या माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेडाव नाक्याप्रमाणेच दादली पूल तसेच नवे नगर या भागात देखील काही प्रमाणात ही माकडे दिसून येत होती मात्र आता या माकडांच्या टोळ्या शहरातील काकरतळे भागात शिरल्या आहेत. यापूर्वी माकडांच्या जातीतील वानर कधीतरी क्वचितच आढळून येत होता मात्र आज अचानक या माकडांच्या टोळ्यांनी विजेच्या तारा, दूरध्वनीच्या वायर्स, कौलारू घरे, इमारतींवरील पत्रे यावरून सैरावैरा पळ काढत मार्गस्थ झाल्या. या माकडांना पाहण्यासाठी खिडक्यांमधून लहान मुलांनी डोकी बाहेर काढली होती मात्र माकडांच्या भीतीमुळे नागरिकांनी त्यांना हुसकावण्यास सुरुवात केली असली तरी ही माकडे खाण्याच्या शोधामध्ये शहरात दाखल झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये उघड्यावर टाकण्यात आलेले खाद्यपदार्थ, भाजीपाला, कचराकुंड्यांमधून ठेवण्यात येणारा ओला कचरा यामुळे ही माकडे शहरातून बाहेर पडणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. भविष्यामध्ये ग्रामीण भागात होणारा त्रास शहरी भागात देखील वाढण्याची शक्यता असल्याने वनविभागाने आणि नगरपालिकेने दखल घेणे गरजेचे आहे.